हो नाही म्हणता म्हणता अखेर निवडणूक रंगा वरती येऊन ठेपली. काल शहर हिरव्या- भगव्या रंगात न्हावून निघाले. दोन भिन्न विचारधारेचे पक्ष एकाच वेळी शहरात सभा घेण्याचा तसा हा दुर्मिळ योग ! यापूर्वी काँग्रेस शिवसेना असा सामना झाला. त्यावेळी खान-बाण, हिरवा -भगवा अशा फारशा चर्चा झडल्या नाहीत. मात्र यावेळी थेट शिवशाही -रजाकारी वरच सामना येऊन ठेपला. आश्चर्य म्हणजे दोन्ही बाजूंचे झिलकरी यावेळी फारसे उत्साहात दिसले नाहीत. तटस्थपणे विचार केला तर यांच्या रंगाचे गुमान जनतेने जनता उतरवणार असे दिसू लागले. ठाकरे यांनी प्रयत्न करूनही मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान कडाडले नाही आणि आणि ओवेसीच्या गर्जनेने ही जबिंदा हेलावले नाही अशीच एकंदर स्थिती. शहर बदल रहे है... याची चुणूक या दोन्ही सभांनी दाखवून दिली. शहराला काय हवे हे या रंग वाल्यांनी ओळखले पाहिजे. मतदारांनी आपल्याच रंगात न्हाऊन निघावे असा अट्टाहास करणाऱ्यांचा बेत काल पुरता फसला. रंगाचा गुमान करणाऱ्यांना मतदारांच्या निरुत्साहाने ठार वेडेच केले. मतदारांना गृहीत धरू नका असाच संदेश दोन्ही सभांनी दिला आहे. थोडाफार शोर जबिंदावर पाहायला मिळाला मात्र तोही परिणामकारक ठरणार नाही, अशी चिन्हे आहेत. एकेकाळी शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद आता एमआयएम ला मिळत असला तरी तो मतांमध्ये किती परावर्तित होतो, हे पाहणे रंजक ठरेल.
शहरातील कालच्या सभा अंतिम निकाल देणाऱ्या ठरल्या. मतदारांनी ठाम निश्चय केलेला नाही, त्यामुळे प्रत्येकाला संधीही खुणावत आहे. अखेरच्या टप्प्यात आता एमआयएमने जोरदार मुसंडी मारली. अपक्षालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या टप्प्यात बेदखल केलेल्या या दोघांनी जोरदार कमबॅक केल्याने प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार पार हादरून गेलेत. मते खाण्यासाठी म्हणून उभे असलेले हे लोक विजयी तर होणार नाहीत ना, अशा शंकेची पाल या उमेदवारांच्या मनात चुकचुकतेय. त्यामुळे खैरेंनी जेवढा धसका घेतला तेवढाच झांबड यांनी घेतला आहे. कट्टर वादाला तिलांजली दिलेल्या मतदारांची भूमिका आता निर्णायक ठरणार यात शंका नाही. हे मतदार कुणाच्या पारड्यात मत कर मतदान टाकतात यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. शिवसेना-भाजप, काँग्रेस आघाडीची भिस्त पारंपरिक मतदारांवरच आहे. नाराजांची मनधरणी करण्यात जो यशस्वी झाला विजय त्याचाच अशी परिस्थिती आहे. काँग्रेस आणि सेनेच्या मतदानात वाटेकरी झालेल्या दोन आमदारांना किती प्रतिसाद मिळतो यावर सेना की काँग्रेस याचे उत्तर मिळेल. काही विश्लेषकांच्या मते एमआयएम आणि हर्षवर्धन जाधव यांनी सामन्यात रंग भरला. जाधवांनी खैरेची तर जलील यांनी झांबड यांची पार दमछाक केली. या दोघांनी निवडणुकीचे गणितच बिघडून टाकले. आता प्रचारासाठी अवघे काही तास उरले आहेत, या दोन दिवसात उमेदवाराचा अन जिल्ह्याच्या भविष्याचाही फैसला होईल.